पुणे जिल्हा | डॉ. मेधा पुरव – सामंत यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

जेजुरी, (वार्ताहर) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्य इतिहासामध्ये अजरामर आहे. जेजुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे एक अतूट आणि श्रद्धेय असे नाते आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेत शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. तितकेच महत्त्व हे महाविद्यालय ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वाड्यात सुरू झाले ती घटनाही तितकीच महत्त्वाची आहे.
आज हे महाविद्यालय ज्या चिंचबागेत, ज्या वास्तूत उभे आहे ती जागाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पवित्र, पावन स्पर्श या जागेला, भूमीला असल्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर या संस्थेने शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे गेल्या वर्षापासून निश्चित केले आहे.
यावर्षीचा दुसरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पुणे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव – सामंत यांना देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार 20 जुलै रोजी भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याप्रसंगी मासूम संस्थेचे डॉ. रमेश अवस्थी याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.





