Manmohan Singh: मारुती 800 ते शू्न्य कर्ज… मनमोहन सिंग यांच्याकडे किती संपत्ती होती? वाचा

Manmohan Singh Net Worth: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. 2004 ते 2014 असे सलग 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्याआधी ते आरबीआयचे गव्हर्नर आणि देशाचे अर्थमंत्री देखील होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोणतीही निवडणूक न लढवता ते दोनदा पंतप्रधान झाले होते. नम्र, सरळमार्गी, साधे राहणीमान मात्र तेवढेच बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात असे. डॉ. मनमोहन सिंग आपल्यामागे किती संपत्ती सोडून गेले, याविषयी जाणून घेऊया.
सलग 10 वर्ष पंतप्रधान
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 1991 च्या आर्थिक सुधारणा लागू करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 2004 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर 2009 मध्ये देखील त्यांच्याकडे पुन्हा या पदाची जबाबदारी होती. सलग 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते या पदावर होते.
डॉ. मनमोहन सिंग यांची संपत्ती
रिपोर्टनुसार, मनमोहन सिंग यांच्याकडे एकूण 15 कोटी 77 लाख रुपयांची संपत्ती होती. वर्ष 2019 मध्ये राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञानपत्रानुसार, त्यांच्याकडे दिल्ली आणि चंदीगडमध्ये एक फ्लॅट होता. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नव्हते.
त्यांच्याकडे 7 कोटी 72 लाख 54 हजार 370 रुपये रोख रक्कम होती. तर 12 लाख 76 हजार रुपये एनएएस आणि पोस्टल सेव्हिंग योजनेत गुंतवले होते. तसेच, 3 लाख 86 हजार 500 रुपये किंमतीचे दागिनेही होते. 2013 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे मारुती 800 ही कार होते.
त्यांच्या नावावर काही निवासी मालमत्ता आणि बँक डिपॉजिट देखील होते. 2013 मध्ये त्यांच्याकडे एकूण 10.73 कोटी रुपयांची संपत्ती होती. तर एसबीआयच्या खात्यात 3.46 कोटी रुपये रोख व गुंतवणूक स्वरुपात होते.





