पुणे | डाॅ. दाभोलकर खून खटल्याचा निकाल दि. १० मे रोजी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला. घटनेच्या तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू झाला. खुनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ जणांविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी न आता पूर्ण झाली असून, दि. १० मे रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. सुरुवातीला पुणे पोलीस या घटनेचा तपास करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जून २०१४ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.
१५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोघे सध्या जामिनावर आहेत.
दरम्यान, सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी २ साक्षीदार न्यायाल्यात उभे केले. आता या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले आहे.





