श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; संविधानाचा जागर

आळंदी – येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी झाली. श्री ज्ञानेश्वर विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक विद्यामंदिर व बालक मंदिरात आयोजित कार्यक्रमाला सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आणि माऊलींच्या प्रतिमा पूजनाने झाली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. विद्यार्थी वेदांत मुरकुटे याने बाबासाहेबांच्या वेशभूषेत त्यांचे कार्य सादर केले. प्रशांत सोनवणे यांनी बाबासाहेबांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि संविधान निर्मितीतील भूमिका विशद केली. सूर्यकांत मुंगसे यांनी बाबासाहेबांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणल्याचे सांगितले.
अजित वडगांवकर यांनी बाबासाहेबांचे पुतळे, शाळा, रस्त्यांची नावे आणि संविधानाचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले. “संत साहित्याचा विचार घेऊन बनवलेले संविधान जगाला मार्गदर्शक आहे. बाबासाहेबांनी समता, प्रेम आणि शिक्षणाचे महत्त्व पटवले,” असे त्यांनी नमूद केले. प्रदीप काळे यांनी आभार मानले, तर योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.





