Dr Aruna Dhere – शिक्षक शाळेला नवे रूप देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा निर्माण होत असून, क्षमतांचा शोध घेण्याची संधी मिळत आहे. अभिमानाचा वारसा, चार-पाच पिढ्यांचा ज्ञानाचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे, असे मत लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.१९२६ साली मुंबई इलाख्यातून मॅट्रिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन करणाऱ्या हुजूरपागा शाळेच्या माजी विद्यार्थिनी वेणू अभ्यंकर उर्फ मैत्रेयी विनोद यांच्या यशप्राप्तीचा शतकपूर्ती समारंभ महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा, विश्व कल्याण गुरुकुल सेवा फाउंडेशन आणि महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या अमृत महोत्सव सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी लेखिका आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. अरुणा ढेरे, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, विश्व कल्याण गुरुकुल सेवा फाउंडेशनच्या संचालक हिमांगी लवाटे, महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्या विश्वस्त ॲड. अदिती वैद्य, महर्षी विनोद फाउंडेशनचे संचालक व योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, शाळेच्या माजी विद्यार्थिनी व आयएएस अधिकारी लतिका पडळकर, माजी खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव रेखा पळशीकर आदी उपस्थित होते.माजी विद्यार्थींनींचे कर्तृत्व आणि हुशारी ही आजच्या विद्यार्थिनींसमोर उत्तम उदाहरणे आहेत. ज्या शाळेने ज्ञान दिले, घडवलं, शिस्त लावली त्या संकुलाबद्दल प्रत्येकाच्या मनात अभिमान असायलाच हवा, असे मत डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी व्यक्त केले. शाळेच्या माजी विद्यार्थिनी लतिका पडळकर लिखित हुजूरपागेच्या संस्कारातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासावर आधारित सामान्य ते असामान्य या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली तनपुरे यांनी केले. साधना घोडके यांनी प्रमुख पाहुणांचा परिचय करून दिला.