डॉ. अनिल रामोड यांना 13 जूनपर्यंत कोठडी

पुणे -पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना शनिवारी (दि.10) न्यायालयात हजर केले. त्यावेळी सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए. एम. वाघमारे यांनी मंगळवारपर्यंत (13 जून) सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भूसंपादनातील मोबदला प्रकरणात आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) व्यक्त केला. लाचखोरीच्या प्रकरणात रामोड यांची सखोल चौकशी करण्यात येत असून त्यांचे निवासस्थान, तसेच कार्यालयातून सहा कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (9 जून) पकडले. त्यांच्या बाणेर येथील
बंगल्यातून सीबीआयच्या पथकाने कागदपत्रे तसेच सहा कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त केली.
महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी डॉ. रामोड यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. रामोड यांनी शनिवारी सीबीआयच्या पथकाने विशेष न्यायालयात हजर केले. सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक आय. बी. पेंढारी यांनी रामोड यांच्या निवासस्थानातून सहा कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्यामुळे रामोड यांनी आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. रामोड लाचखोर (हॅबिच्युअल ऑफेंडर) असल्याचे सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार वकील आणि रामोड यांच्यात झालेले संभाषण ध्वनीमुद्रीत करण्यात आले आहे. या संभाषणातून रामोड यांनी पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. संभाषण पडताळणीसाठी रामोड यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. रामोड यांच्या निवासस्थानात मोठी रोकड सापडली. ही रोकड त्यांनी कोठून आणली, त्यांनी ही रोकड कोणी दिली, यादृष्टीने सखोल तपास करायचा आहे. तपासासाठी रामोड यांना पाच दिवसांची कोठडी मिळावी, अशी विनंती सीबीआयचे वकील ऍड. अभय अरीकर यांनी न्यायालयात युक्तीवादात केली. रामोड यांच्या वतीने ऍड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली.
रामोड यांचे तपासास सहकार्य नाही
सीबीआयने रामोड यांना अटक केल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत रामोड सहकार्य करत नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.





