Nagar | अमोल खताळ हेच माझ्यासाठी डॉ. सुजय विखेः मंत्री विखे

संगमनेर, (प्रतिनिधी)- महायुतीची उमेदवारी डॉ. सुजय विखे यांना मिळाली नसली तरी महायुतीचा धर्म आपण सर्वांनी पाळून अमोल खताळ यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अमोल खताळ हेच माझ्यासाठी डॉ. सुजय विखे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.
संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवशी महायुती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमोल धोंडीबा खताळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री विखे हे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री विखे म्हणाले की, धांदरफळ या ठिकाणी सभा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या गाड्या फोडल्या जाळल्या, महिलांना मारहाण केली. त्याबद्दल साधी माफी सुद्धा मागण्याची दानत आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये नव्हती.
त्यामुळे धनशक्ती विरोधात लोकशक्ती अशी ही निवडणूक असून यामध्ये लोकशक्तीचा विजय होईल. आता येथील दहशतवाद आम्ही संपून टाकू, अमोल खताळ हेच माझ्यासाठी डॉक्टर सुजय विखे आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्वांनी आता त्यांना पाठिंबा देऊन त्यांचे काम करून त्यांना निवडून आणावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.





