डॉ. नायडू रुग्णालयासाठी आणखी 20 डॉक्टर्स, 40 नर्सेसची मागणी

पुणे – शहरात करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर परदेशांतून पुण्यात आलेल्यांची तपासणीसाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यामुळे नायडू रुग्णालयातील यंत्रणेवर ताण येत असून, यासाठी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे आणखी 20 डॉक्टर्स आणि 40 नर्सेसची मागणी केली आहे.
सध्या कार्यरत असलेले डॉक्टर्स तसेच स्टाफ दररोज 10 ते 15 तास काम करत असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे ही मागणी केल्याचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले आहे. शहरात करोनाचे रुग्ण सापडल्यानंतर नायडू रुग्णालयात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
सध्या येथील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दररोज परदेशांतून आलेल्या नागरिकांची विमानतळ तसेच पालिकेच्या विलगीकरण कक्षात तपासणी करण्यात येत आहे. त्यातील संशयितांना नायडू रुग्णालयात तपासणी तसेच उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. या रुग्णालयाचा स्टाफ 40 वरून 140 पर्यंत नेण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावरही ताण येत असून त्यांनाही आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.





