शिवसेनेचे डझनभर खासदार लोकसभेत वेगळा गट बनवण्याच्या तयारीत? शिवसेनेने ठोठावला लोकसभा सभापतींचा दरवाजा

नवी दिल्ली – बंडखोर शिंदे गटाचा सामना करण्यास सज्ज झालेल्या शिवसेनेने सोमवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचा दरवाजा ठोठावला. त्याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली.
शिवसेनेचे डझनभर खासदार लोकसभेत वेगळा गट बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शिवसेना संसदीय पक्षात फूट अटळ आहे, अशी कुजबूज सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी बिर्ला यांच्याकडे एक पत्र सादर केले. त्यातून पक्षाच्या इतर गटाच्या म्हणण्याकडे लक्ष न देण्याचे साकडे घालण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. अशात शिवसेनेने न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली.
त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत असणाऱ्या आमदारांच्या विरोधातील अपात्रतेच्या प्रक्रियेला आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकेवरही एकत्रितपणेच सुनावणी होईल. न्यायालयात याआधीच पाच याचिका दाखल आहेत. आता नवी याचिका सहावी ठरली आहे.





