Download Digital 7/12 : डिजिटल सातबारा घरबसल्या मोबाईलवर कसा डाऊनलोड करायचा? जाणून घ्या सोपी पद्धत

Download Digital 7/12 : महाराष्ट्र शासनाने आता डिजिटल ७/१२ उताऱ्याला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे जमिनीचे व्यवहार आणि शासकीय कामांसाठी लागणारा महत्त्वाचा दस्तावेज सातबारा केवळ १५ रुपयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी असून, केवळ गट नंबर आणि सर्व्हे नंबर तुमच्याकडे असल्यास तुम्ही घरबसल्या ५ मिनिटांत कायदेशीररित्या मान्य असलेला डिजिटल ७/१२ मिळवू शकता.
यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख/भूलेख या अधिकृत संकेतस्थळाला (https://bhulekh.mahabhumi.gov.in/) भेट द्यावी लागेल.
या संकेतस्थळावर दोन प्रकारचे दस्तावेज मिळतात – माहिती तपासण्यासाठी विना-स्वाक्षरीचे मोफत दस्तावेज आणि दुसरे म्हणजे अधिकृत स्वाक्षरी असलेले (Digitally Signed) दस्तावेज, जे सरकारी कामांसाठी कायदेशीररित्या वापरता येतात. अधिकृत ७/१२ मिळवण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया खालीलप्रमाणे जाणून घ्या…
विभाग निवडून लॉग इन करा –
-संकेतस्थळ उघडल्यानंतर सर्वात आधी तुमचा विभाग निवडा. (उदा. अमरावती, कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर).
-त्यानंतर ‘डिजीटली साइन्ड ७/१२’ या पर्यायावर क्लिक करा.
-संकेतस्थळ वापरण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावे लागेल. यासाठी ‘नवीन युजर रजिस्ट्रेशन’ किंवा सोपा असलेला ‘ओटीपी बेस्ड लॉग इन’ पर्याय निवडा. मोबाईल नंबर वापरून तुम्ही लगेच लॉग इन करू शकता.
अकाउंट ‘रिचार्ज’ करा –
-लॉग इन आणि व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला आपले अकाउंट रिचार्ज करावे लागेल.
-येथे तुम्ही १५ ते १,००० रुपयांपर्यंतचा रिचार्ज करू शकता. ७/१२ उताऱ्यासाठी १५ रुपयांचे शुल्क आवश्यक असल्याने, तुम्ही तेवढा रिचार्ज करू शकता.
-रिचार्जसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय (UPI) आणि नेटबॅन्किंगचे पर्याय उपलब्ध आहेत.
गट नंबर भरून माहिती तपासा –
-रिचार्ज झाल्यावर नवीन पेज ओपन होईल. तिथे तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडा.
-यानंतर ‘अंकित ७/१२’ या पर्यायावर क्लिक करा.
-आवश्यक असलेला तुमचा सर्व्हे नंबर व गट नंबर प्रविष्ट (Enter) करा.
-माहिती भरल्यानंतर, तुमच्या गट क्रमांकाचा ७/१२ कोणत्या तारखेला स्वाक्षरीत झाला आहे, याची माहिती असलेला एक बॉक्स दिसेल. त्यावर ‘ओके’ क्लिक करा.
शुल्क भरा आणि डाऊनलोड करा –
-त्यानंतर तुमच्या खात्यातील १५ रुपये वजा होतील, असा संदेश स्क्रीनवर दिसेल. ‘ओके’ वर क्लिक करून शुल्क वजा करण्याची परवानगी द्या.
-क्षणार्धात तुमचा डिजीटली साइन्ड ७/१२ उतारा पीडीएफ (PDF) फॉरमॅटमध्ये तुमच्यासमोर उपलब्ध होईल.
-स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘डाऊनलोड’ पर्यायावर क्लिक करून तुम्ही हा कायदेशीर मान्यता असलेला उतारा डाऊनलोड करू शकता.
इतर दस्तावेजही उपलब्ध –
याच संकेतस्थळावरून नागरिकांना ८ अ चा उतारा, फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड देखील डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रत्येक दस्तावेजासाठी आवश्यक माहिती आणि शुल्क वेगवेगळे आहे.





