Motor Vehicle tax : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाढलेल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या जुन्या वाहनांना दुप्पट कर लावण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात मांडलेल्या स्क्रॅपिंग पाॅलिसीत नवीन वाहन खरेदीवर करसवलती जाहीर केल्याने जुनी गाडी स्क्रॅप करून नवीन गाडी घेणे अधिक फायद्याचे ठरणार आहे. नियमानुसार खासगी वाहनांचे १५ वर्षांनंतर नोंदणी नूतनीकरण अथवा स्क्रॅपिंग करावे लागते. व्यावसायिक वाहनांवर ८ वर्षांनंतर पर्यावरण कर लागू होतो आणि १५ वर्षांनंतर फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असते. १५ वर्षांपेक्षा जुनी शासकीय वाहनेही टप्प्याटप्प्याने बाद केली जातात. मात्र, पुणे शहरासह जिल्ह्यात आजही जुन्या तंत्रज्ञानावर आधारित (बीएस-१, २ आणि ३) वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये १५ वर्षावरील वाहन संख्या जवळपास साडेबारा लाख आहे. या जुन्या वाहनांवरील पर्यावरण कर (ग्रीन टॅक्स) आता थेट दुप्पट केल्याने अशा वाहनांचे पासिंग आणि नूतनीकरण अधिक खर्चिक होणार आहे. दरम्यान, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाच्या करसवलती वाहनधारकांसाठी सुवर्णसंधी असून, जुन्या गाड्या मोडीत काढून नवीन, सुरक्षित वाहन घेणे अधिक फायदेशीर ठरेल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले. स्क्रॅपिंग केल्यास सवलत स्क्रॅपिंग पाॅलिसीनुसार खासगी वाहनांसाठी करामध्ये १६ ते २५ टक्के सवलत मिळू शकते. व्यावसायिक वाहनांसाठी २५ ते ३० टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जुन्या वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारणे हा प्रमुख उद्देश असून, इंधनाचीही बचत होईल. Gas Shortage: सिलिंडरसाठी रांगा लागल्या नाहीत, ऑनलाइन बुकिंगद्वारेच पुरवठा; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती