पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पत्नीवर चाकूने वार करत आणि सोळा वर्षांच्या मुलीचा उशीने गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना शनिवारी पहाटे कात्रज- दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. श्वेता टिळेवाले (४०) आणि शिरोली टिळेवाले (१६) अशी मृतांची नावे आहेत, तर पती अजय टिळेवाले (४५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हा फायनान्सची कामे करतो, तर श्वेता एका चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये काम करत होती. श्वेताचा हा दुसरा विवाह असून, शिरोली ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. अजयपासून तिला तीन वर्षांचा एक मुलगा असून, तो तिच्या आई- वडिलांकडे असतो. मागील काही दिवसांपासून पती- पत्नीमध्ये घरगुती आणि आर्थिक कारणावरून वाद सुरु होते.
शुक्रवारी रात्री भांडण झाल्यावर पत्नी माहेरी निघुन जाते, म्हणत झोपायला निघुन गेली. दरम्यान, शनिवारी पहाटे अजयनेच पत्नीच्या छातीवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर नेहमी आईची बाजू घेणाऱ्या मुलीचाही खून् केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी अजय स्वत:हून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांचे एक पथक तातडीने तो राहात असलेल्या लेक विस्टा सोसायटीमध्ये पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठवले.
अजयचा श्वेताबरोबर प्रेमविवाह होता. त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन हा विवाह केला होता. यामुळे त्याने विवाहानंतर नातेवाइकांशी संपर्क तोडला होता. प्राथमिक तपासात घरगुती वाद हे कारण पुढे आले आहे – दशरथ पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)