पुण्याची संस्कृती बिघडवू नका; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची भाजप प्रदेशाध्यक्षांवर टीका

पुणे – “गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबातील काही मंडळींनी मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा प्रयत्न केला. या प्रकारावरून भाजपचा खरा चेहरा उघड होत असून भाजपने पुण्याची संस्कृती बिघडवू नये,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
याबद्दल बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, “महापौर मुरलीधर मोहोळ व इतर नेत्यांनी यावेळी या प्रवेशाबाबत हात वर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ झाला.
प्रत्यक्षात तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच पोलादी हातांनी पुण्याची गुंडगिरी मोडून काढा, अशी गर्जना केली होती. त्याचे काय झाले? या गर्जनेचा भाजपला विसर पडला आहे का? असा सवाल करत पुण्याची ओळख ही सुसंस्कृत शहर म्हणून आहे. ती तशीच राहू देण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. शहराच्या विकासाच्या प्रश्नांपासून पळ काढणारे चंद्रकांत पाटील यांनी निदान पुण्याची संस्कृती बिघडू न देण्याच्या जबाबदारीपासून तरी पळ काढू नये,’ अशी टीका जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार आहेत. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्याचा अहवाल प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे अनेक नागरिक आमदार पाटील यांच्यासोबत फोटो काढत होते. त्या प्रत्येकाची ओळख तपासणे शक्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशा प्रकारचे राजकारण करू नये. प्रशांत जगताप हे चंद्रकांत पाटील यांची प्रतिमा खराब करण्यासाठी वारंवार असे आरोप करत आहेत. हे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.
– जगदीश मुळीक, भाजप, शहराध्यक्ष





