Sushma Andhare : पुण्यातील रेव्ह पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच आता या प्रकरणी शिवेसना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, अशी प्रतिक्रिया त्यांनी रेव्हपार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर दिली आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश असल्याचे अंधारले म्हणाल्या आहेत. चुप बैठो नही तो रेड करुंगा, असा संदेश असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नेमकं प्रकरण काय? काल शनिवारी मध्यरात्री पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागातील एका सोसायटीत सुरू असलेला रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले असून, यामध्ये एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतरचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. खेवलकर यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.