कोहलीच्या खेळाचे समीक्षण करू नका – कपिलदेव

नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला सध्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या सगळेच त्याच्यावर टीका करत आहेत तर सोकॉल्ड समिक्षक त्याच्या खेळीवर वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. मात्र, महान क्रिकेटपटू कपिलदेव यांनी मात्र, अशा समीक्षकांचे कान टोचले आहेत. कोहलीही महान फलंदाज असून त्याला भरात येण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही एका मोठ्या खेळीची त्याला गरज आहे, असा विश्वासही कपिल यांनी व्यक्त केला.
जवळपास 2 वर्षांपासून कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. इंग्लंड दौऱ्यावरही त्याने चांगली सुरुवात केली पण शतकापर्यंत मजल मारण्यात पुन्हा तो कमी पडला. यारून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कोहली लवकरच शतकाचा दुष्काळ संपवेल. ज्यावेळी तो धावा करत होता त्यावेळी कुणाला त्याच्या खेळीवर आक्षेप नव्हता. आता ज्यावेळी त्याच्या कामगिरीचा आलेखात चढ-उतार दिसत आहे त्यावेळी त्याच्यासंदर्भात प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.
यापूर्वी शतक आणि द्विशतक करताना त्याच्यावर दबाव नव्हता का? असा सवालही कपिल यांनी केला आहे. त्याच्या कामगिरीत चढ-उतार दिसत असला तरी तो फार काळ टिकणार नाही. तो अनुभवासह परिपक्व झाला असून पुन्हा लयीत आल्यावर तो शतक आणि द्विशतकावर थांबवणार नाही तर त्रिशतक झळकावले, असा विश्वासही कपिल यांनी व्यक्त केला आहे.





