Uddhav Thackeray | मुंबई महापालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य सरकारने प्रभागरचनेचे आदेश प्रसिद्ध केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेना उबाठाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व शाखाप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात बोलावली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘विधानसभेची चूक पुन्हा करू नका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. आपण जी कामे करून दाखवली, ती महायुती सरकारने कशी घालवून दाखवली, हे जनतेपर्यंत पोहोचवा. पालिकेवर पुन्हा भगवा एकहाती फडकवण्यासाठी जोमाने काम करा,’ असे आदेश शाखा प्रमुखांना दिले. उद्धव ठाकरेंनी नेमके काय दिले आदेश ? “आपल्याला मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, महाविकास आघाडीच्या काळात मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मुंबईकरांना दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आणि महायुती सरकारच्या काळात कशा सुविधा कमी झाल्या हे जनतेपर्यंत जाऊ पोहचवा. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण यांसारख्या सुविधा देतानाच सागरी किनारा मार्गासारखे महत्त्वाचे प्रकल्प आम्ही मुंबईकरांना दिले. आम्ही सर्व करून दाखवले असताना सत्ताधाऱ्यांनी हे सगळे गमावून दाखवले. हीच गोष्ट मतदारांच्या लक्षात आणून द्या आणि विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करा,” असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. Uddhav Thackeray | मतदार याद्यांची तपासणी करा दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा तसेच या फेरफारामुळे मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा मुद्दा या वेळी शाखाप्रमुखांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर आगामी काळात या सर्व मतदार याद्या तपासण्याचे आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. आपली यंत्रणा उभी करून या मतदारयाद्यांची तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिल्याचे समजते. Uddhav Thackeray | मतदार याद्यांतील किमान ३०० घरातील मतदारांशी प्रत्येक शाखांनी आत्तापासून संपर्क ठेवावा व त्यांची पहिली जबाबदारी उपशाखाप्रमुखांनी घ्यावी, असे आदेश ठाकरे यांनी दिले. दरम्यान, मुंबई महापालिका उद्धव ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. हेही वाचा : “सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात?”; इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल