उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका – सत्यजित तांबे

नाशिक – पुण्याच्या ससून रुग्णालयातील घडलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता. दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. खरी माहिती समोर येईल, असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या. यावर आता आमदार सत्यजित तांबे यांनीही भाष्य केले आहे.
काय म्हणाले सत्यजित तांबे?
नाशिकच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. ‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका. राज्यभरात पोलिसांनी भरारी पथके तयार करून शाळांबाहेरील छोट्या टपऱ्या व दुकानांवर नजर ठेवावी, अशी मागणीही आमदार तांबे यांनी केली.
मुंबईसह अनेक शहरांत शाळा-महाविद्यालयांजवळील पानटपऱ्या, लहान दुकानात अंमली पदार्थ विकण्याच्या घटना याआधी उघडकीस आल्या होत्या. शालेय मुलांना व्यसनाधीन करून अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचे प्रकार घडले होते. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडत असेल, तर नाशिकच नाही, तर राज्यभरातील पालक, शाळा प्रशासन आणि पोलीस या सर्वांनीच सावध राहिले पाहिजे.
देशाच्या भवितव्यासाठी मोठा धोका
देशातील तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असतील, तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. सुदृढ तरुण ही देशाची खरी संपत्ती असते. अंमली पदार्थांच्या व्यसनापासून तरुणांना आणि खास करून शाळकरी मुलांना वाचवू शकलो नाही, तर तो देशाच्या भवितव्यासाठी मोठा धोका असेल. पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. शाळा प्रशासनानेही त्यांच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली घडतात का, याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही सत्यजित तांबे म्हणाले.




