“…मराठी माणसाला विसरू नका”; राज ठाकरेंनी भेटीदरम्यान नरेश म्हस्केंना दिला सल्ला

MNS Raj Thackeray| मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता ठाण्यातून निवडून आल्यानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे.
आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्री तानाजी सावंत, ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना मुंबई पदवीधर उमेदवार डॉ. दीपक सावंत शिंदेंच्या ताफ्यातील तीन नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नरेश म्हस्के यांनी एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, “आदरणीय राज ठाकरे साहेब… विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली, विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते.
या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी खास माझ्यासाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभा ही घेतली. त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला.
आदरणीय @RajThackeray साहेब…
विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली, विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो, आणि त्यांचे… pic.twitter.com/bsL7rAHKio
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 11, 2024
साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आणि त्याचं फलित आज समोर आहे. लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आज आदरणीय राज साहेबांची भेट घेतली.
साहेबांनी दिलखुलास गप्पा मारत, “दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला दिल्लीत पाठवलं आहे” अशी दरारायुक्त सूचना केली… त्यांची प्रत्येक सूचना आम्हाला मोलाची आहे. राज साहेब, मराठी माणसाचा आवाज तर आम्ही बुलंद करूच पण आपल्या या मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या, आणि विषय यांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच करू आणि तुमचा विश्वास सारखं ठरवू,” असा विश्वासही नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांना या निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवारी दिली होती. तर या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. मात्र म्हस्के यांनी राजन विचारेंचा २ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव करत मोठा विजय मिळवला.
हेही वाचा:
‘इतरांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन…’ ; मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल





