Donation Rule Change : आयकर विभागाकडून धार्मिक संस्थांच्या करमाफी नियमात बदल; आता 2 लाखांपेक्षा…

मुंबई :- आयकर विभागाने धार्मिक संस्थांच्या मिळणाऱ्या आयकर सुटीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार धार्मिक संस्थांना आता मिळालेल्या देणग्यांचा सविस्तर तपशील द्यावा लागणार आहे.
आयकर नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यानुसार आता धार्मिक संस्थांना ते राबवत असलेले उपक्रम धार्मिक आहेत की, धार्मिक-सह-चॅरिटेबल आहेत, हे उघड करावे लागणार आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीकडून एका दिवसात दोन लाख रुपयांहून अधिक देणगी मिळाल्यास देणगीदाराचे नाव आणि पत्ता, देय रक्कम आणि त्याच्या पॅन कार्डची माहितीही द्यावी लागणार आहे.
सरकारने आता आयकर नियमांमध्ये (नियम “2 क’, “11अअ’ आणि “17 अ’साठी बदल केले आहेत. सरकारने अलीकडेच धर्मादाय संस्थांना आयकर कायद्यांतर्गत कर सूट किंवा “80 जी’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागू असलेल्या नोंदणी आवश्यकतेमध्ये सुधारणा केली आहे.
सुधारित नियम हे 1 ऑक्टोबर 2023 पासूनच लागू होतील, याशिवाय संबंधित नव्या नियमांच्या फॉर्मच्या शेवटी दिलेल्या हमीपत्रातही काही बदल करण्यात आले आहेत.
प्राप्तिकर कायद्यांतर्गत धर्मादाय संस्था, धार्मिक ट्रस्ट आणि वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांच्या उत्पन्नावर करमुक्ती आहे. मात्र, ही सूट प्राप्त करण्यासाठी या संस्थांना आयकर विभागाकडे नोंदणी करावी लागेल.





