Donald Trump : इराणसोबतचे युद्ध थांबणार? लष्करी मोहिमा थांबवण्याचे संकेत देत ट्रम्प यांनी ठेवली अट
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता इतर देशांनी घ्यावी, डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

Donald Trump: इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. सोशल ट्रूथ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ट्रम्प यांनी अमेरिका इराणसोबतचे युद्ध लवकरच थांबवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.
यावेळी ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबद्दलही एक महत्त्वाचं विधान केले आहे. इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिका आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता इतर देशांनी घ्यावी, असं आवाहनही ट्रम्प यांनी केलं आहे.
पुढे ट्रम्प म्हणाले, “इराणची क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे निकामी करणे, त्यांचा संरक्षण औद्योगिक तळ उद्ध्वस्त करणे आणि त्यांचे नौदल व वायुसेना संपवणे, हे आम्ही साध्य केले आहे. इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत आणि इतरांसह आमच्या मध्यपूर्वेतील मित्रपक्षांना आम्ही सर्वोच्च पातळीवर संरक्षण दिले आहे.
‘इराण कधीही अण्वस्त्रे विकसित करू शकणार नाही’ Donald Trump
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून असलेल्या देशांना तिची सुरक्षा हाती घेण्याचे आवाहनही डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तसेच, इराण कधीही अण्वस्त्रे विकसित करू शकणार नाही याची अमेरिका खात्री करेल, असेही त्यांनी नमूद केले.
“होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या इतर देशांनी तिचे रक्षण आणि नियमन करणे आवश्यक आहे. अमेरिका त्याचे रक्षण करणार नाही. अमेरिका मदत करू शकते, पण त्याची गरज भासू नये.
आम्ही या देशांना त्यांच्या होर्मुझमधील प्रयत्नांमध्ये मदत करू, परंतु एकदा इराणचा धोका पूर्णपणे नष्ट झाला की याची गरज उरणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, या देशांसाठी ही एक सोपी लष्करी मोहीम असेल,” असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे सैन्य माघारीची घोषणा केलेली नाही. मात्र अमेरिका आपले वर्चस्व कायम ठेवून थेट युद्धभूमीवरील सहभाग कमी करू इच्छिते, असे ट्रम्प यांच्या पोस्टमधून संकेत मिळत आहेत. Donald Trump
होर्मुझ सामुद्रधुनी ही तेल-गॅस निर्यात होणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. रिपोर्ट्सनुसार जगाच्या एकूण तेल निर्यातीपैकी २० टक्के तेल होर्मुझ सामुद्रधुनीत जाते.
हेही वाचा:






