नवी दिल्ली/ वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम झाला आहे. आता अमेरिका भारतातून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्क लावणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी ही घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून भारताला २५ टक्के आयात शुल्क भरावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर लिहिले की, भारत आमचा मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही भारतासोबत तुलनेने कमी व्यापार केला आहे, कारण त्यांचे कर खूप जास्त आहेत, जगात सर्वाधिक कर भारतात आहेत. भारताने रशियाकडून बहुतेक शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे खरेदी केली आहेत. चीनसह, भारत रशियाचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमध्ये लोकांची हत्या थांबवावी असे वाटते, तेव्हा या सर्व गोष्टी चांगल्या नाहीत. म्हणूनच १ ऑगस्टपासून भारताला २५ टक्के आयात कर आणि दंड भरावा लागेल. ट्रम्प (Donald Trump) यांनी जे काही म्हटले आहे त्यातून त्यांनी रशियाचा राग भारतावर काढला असा एकच अर्थ त्यातून घेतला जाऊ शकतो. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एकीकडे भारताचा मित्र म्हणून उल्लेख केला, मात्र त्याचवेळी त्यांनी भारताला प्रचंड कर लावणारा आणि जगात सगळ्यांत जास्त त्रास देणाराही म्हटले. भारताची व्यापार धोरणे आर्थिकेतर अडथळे आणखी कठीण बनवतात. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया- युक्रेन संघर्षात रशियाला युद्धासाठी पैसे देण्याचा आरोपही ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर केला. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करत आहे हे अमेरिकेच्या नाराजीचे मुख्य कारण आहे. त्यावरून अमेरिकेकडून सातत्याने टीका झाली असली तरी भारताने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाकडून तेल खरेदीचा हा निर्णय भारताच्या ऊर्जेच्या गरजा आणि बजेट मर्यादा लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. भारताची तेल आयात राजकीय रणनीतीवर आधारित नाही तर बाजारातील मागणीवर आधारित आहे असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. पुन्हा चर्चेची योजना? भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारत ऑगस्टच्या मध्यात अमेरिकेसोबत व्यापक व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे. एक अमेरिकन शिष्टमंडळ भारताला भेट देणार आहे. ऑक्टोबरपर्यंत व्यापक द्विपक्षीय व्यापार करार होईल अशी अपेक्षा आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहेत. त्यांनी पुढे सांगितले की ट्रम्प सर्वात वाईट परिस्थितीतही शुल्क आदेश जारी करू शकतात. पण, आम्हाला वाटते की ही तात्पुरती उपाययोजना असेल, कारण आतापर्यंत व्यापार चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. लवकरच एक करार होईल.