वॉशिंग्टन : युक्रेनने गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला केलेला नाही, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी निश्चितपणे सांगितल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा दावा क्रेमलिनने केला होता. पण या दाव्याला ट्रम्प यांनी छेद देणारे वक्तव्य केले आहे. मॉस्कोच्या वायव्येकडील नोवगोरोड भागातल्या पुतीन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने अनेक ड्रोन डागली होती. पण रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने ही सर्व ड्रोन हवेतच नष्ट केली असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी वेगाने सुरू असतानाच युक्रेनने हा ड्रोन हल्ला केल्याचा आरोपही लावरोव्ह यांनी केला होता. ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की फ्लोरिडाला गेले असतानाच लावरोव्ह यांनी हा आरोप केला होता. युद्धबंदीसाठी अजूनही दोन्ही बाजूंमध्ये २० कलमी प्रस्तावित करारावर सहमती होऊ शकलेली नाही. युद्धबंदीसाठीची संवादाची प्रक्रिया विस्कळीत करण्यासाठीच रशियाने युक्रेनवर हा आरोप केला असल्याचे युरोपातील नेते म्हणाले होते.