Donald Trump : ट्रम्प यांचे महत्वाकांक्षी काटकसरीचे विधेयक संसदेत मंजूर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कल्पनेतून मांडण्यात आलेले खर्चात कपात करणारे महत्वाकांक्षी विधेयक अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये मंजूर झाले आहे. शनिवारी रात्री या विधेयकावर संसदेत चर्चेला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत या विधेयकावर बराच विचार करण्यात आल्यानंतर झालेल्या मतदानात अत्यंत थोड्या मताधिक्याने हे विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ५१ तर विरोधात ४७ मते पडली. आता हे विधेयक संसदेतील पुढील मतदानासाठी मांडले जाणार आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाने पहिल्यापासूनच या विधेयकाला विरोध केला होता. त्याबरोबर रिपब्लिकन पक्षातील काही सदस्यांनी या विधेयकाविरोधात भूमिका घेतल्यामुळे मतदानाच्यावेळी समसमान मतविभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशावेळी निर्णायक मत नोंदवण्याची तयारी उपाध्यक्ष जे.डी.वान्स यांनी आगोदरच केली होती.
बिग ब्युटिफुल बिल…
काटकसरीच्या विविध तरतूदींचा समावेश असलेल्या या विधेयकाला ट्रम्प यांनी मोठे सुंदर विधेयक (बिग ब्युटिफुल बिल) असे संबोधले होते. हे विधेयक ट्रम्प यांच्या कर कपात आणि खर्चाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. हे विधेयक अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सर्वोच्च इमिग्रेशन, सीमा, कर कपात आणि लष्करी प्राधान्ये आणि धोरणांसाठी निधीवर लक्ष केंद्रित करते. ट्रम्पच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात लागू केलेल्या २०१७ च्या कर कपातीचा विस्तार देखील हे विधेयक करेल. त्यामुळे इतर कर कमी झाले आणि इमिग्रेशनवरील कारवाईचा भाग म्हणून लष्करी आणि सीमा सुरक्षेवरील खर्च वाढला.





