वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाहून निघालेल्या आणि ट्रेन डी अरागुआ टोळीने चालवलेल्या ड्रग्ज वाहून नेणाऱ्या जहाजावर अमेरिकेने दक्षिण कॅरिबियनमध्ये हल्ला केला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. या हल्ल्यात किमान ११ जण ठार झाले आहेत. हे दहशतवादी आंतरराष्ट्रीय समुद्रात बेकायदेशीर अंमली पदार्थांची वाहतूक करून अमेरिकेकडे जात असताना हा हल्ला करण्यात आला, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हे जहाज एका नार्को-दहशतवादी संघटनेद्वारे चालवले जात होते, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे. ही कारवाई अत्यंत प्राणघातक होती, अशा शब्दात रुबिओ यांनी या कारवाईचे वर्णन केले आहे. ड्रग कार्टेल, सुरक्षा आणि आयात शुल्कासारख्या अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मेक्सिको आणि इक्वाडोरला रवाना होण्यापुर्वी त्यांनी या कारवाईचे समर्थन केले. मात्र अमेरिकेच्या या कारवाईमुळे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो संतप्त झाले आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट युद्धाची धमकीच दिली आहे. जर अमेरिकेने लष्करी हल्ले केले, तर व्हेनेझुएलाला देखील शस्त्रे उचलावी लागतील, असे मादुरो यांनी म्हटले आहे. ट्रम्प सावध रहा, कारण रुबिओ यांना तुमच्या हातांवर रक्ताचे डाग रंगवायचे आहेत, असे मादुरो यांनी म्हटले आहे. करॅकस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. व्हेनेझुएलाचे नागरिक सैनिक आहेत. कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी ते सदैव तत्पर आहेत. जास्तीत जास्त प्रतिकार करण्याची क्षमता व्हेनेझुएलामध्ये आहे, असे सांगतानाच मादुरो यांनी ट्रम्प यांना युद्ध सुरू करण्याऐवजी युद्ध समाप्त करण्याचे आवाहन केले.