Donald Trump : मेक्सिको, कॅनडावर ट्रम्प लादणार आयात शुल्क

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे घेणार आहेत. आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात काही देशांवर मोठे आयात शुल्क लावले जाण्याचे सूतोवाच त्यांनी यापुर्वीच केले आहे. चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमधून अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर भरमसाठ आयातशुल्क लावण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.
अमेरिकेतील उत्पादन कंपन्यांचे हित लक्षात घेऊन या उत्पादनांवर आयात शुल्क लावले जाणार आहे. मात्र आयात शुल्क लावल्या जाणाऱ्या या देशांच्या यादीमधून भारताला वगळण्यात आले आहे, ही भारतीयांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेचच आपण आयात शुल्काबाबतच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहोत, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
मेक्सिको आणि कॅनडामधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लावले जाईल. त्या व्यतिरिक्त चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के आयात शुल्क लावले जाईल. चीन सरकार जोपर्यंत सिंथेटिक ओपिओइड फंटॅनाईलची तस्करी रोखण्यासाठी पावले उचलत नाही, तोपर्यंत हे अतिरिक्त आयातशुल्क लावले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.





