Donald Trump: पदभार स्विकारण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, टॅरिफ वाढीबाबत म्हणाले…

Donald Trump on High Tariffs: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत भूमिका मांडत आहेत. पुढील काही दिवसातच ट्रम्प हे अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्याआधीच त्यांनी भारताला टॅरिफवरून धमकी दिली आहे. भारतीय वस्तूंवरील टॅरिफमध्ये वाढ केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याआधी देखील ट्रम्प यांच्याकडून टॅरिफबाबत सातत्याने वक्तव्य करण्यात आली आहेत.
‘जेवढा कर भारत अमेरिकेच्या वस्तूंवर लावेल, तेवढाच कर अमेरिकेकडून देखील भारतीय वस्तूंवर लावला जाईल’, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताद्वारे अमेरिकेतून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर लावल्या जाणाऱ्या कराचा विरोध करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
ट्रम्प भारताचा उल्लेख करताना म्हणाले की, जर भारत आमच्यावर 100 टक्के शुल्क लावत असेल, तर आपण त्यांच्यावर कोणतेच शुल्क आकारू नये का? भारत आणि ब्राझीलकडून मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारले जाते. जर ते आमच्याकडून उच्च टॅरिफ आकारात असेल तर आम्ही देखील त्यांच्याकडून तेवढ्याच प्रमाणात टॅरिफ आकारू.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे सध्याच्या आर्थिक धोरण चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, ‘इतर देश जास्त कर आकारात असतील, तर आम्ही देखील तेवढाच कर आकारू’, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे वाणिज्य मंत्री आणि ट्रम्प यांचे कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक यांनी देखील ट्रम्प यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, रिसिप्रोसिटी (समान कर) हा ट्रम्प सरकारच्या कार्यकाळात महत्त्वाचा मुद्दा असेल. तुम्ही आमच्याशी जसा व्यवहार कराल, तशाच व्यवहाराची अपेक्षा ठेवायला हवी.





