अबुजा, (नायजेरिया) : नायजेरियामध्ये ख्रिश्चनांच्या हत्या होत असल्याने तेथे लष्करी कारवाई करण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ख्रिश्चनांच्या हत्या रोखण्यात नायजेरिया सरकारला अपयश येत आहे. जर नायजेरियाच्या सरकारने ख्रिश्चनांच्या हत्या रोखल्या नाहीत, तर नायजेरियाला अमेरिकेकडून करण्यात येणारी सर्व मदत तातडीने बंद करण्यात येईल. तसेच नायजेरियामध्ये लष्करी कारवाई करण्यात येईल. तेथे ख्रिश्चनांच्या हत्या करणारा इस्लामिक दहशतवाद संपूर्ण संपवून टाकण्यात येईल, असा इशाराही ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संदेशातून दिला आहे. मी आमच्या युद्ध विभागाला संभाव्य कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर आम्ही हल्ला केला तर तो जसे दहशतवादी गुंड आपल्या प्रेमळ ख्रिश्चनांवर हल्ला करतात, तसाच जलद, क्रूर आणि गोड असेल, असेही ट्रम्प म्हणाले. या इशाऱ्याचा अर्थ नायजेरियामध्ये अमेरिकेचे सैन्य पाठवले जाणार का हवाई हल्ले होतील, असे पत्रकारांनी विचारले असता, ट्रम्प यांनी तसे होऊ शकते, असे संदिग्ध उत्तर दिले. ते ख्रिश्चनांच्या हत्या करत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी अलिकडेच नायजेरियातील इस्लामी कट्टरवादी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी ट्रम्प यांची टीका धुडकावून लावली होती. नायजेरियाची लोकसंख्या २२० दशलक्ष असून तेथे ख्रिश्चन आणि मुस्लिम समान प्रमाणात आहेत. बोको हराम दहशतवाद्यांच्या कारवाया तेथे वाढत असून इस्लामिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जातो आहे.