‘श्रीमंत होण्याची हीच उत्तम वेळ…’, शेअर बाजार गडगडले; मंदीचे सावट; मात्र ट्रम्प ‘टॅरिफ’च्या निर्णयावर ठाम

Trump Tarrifs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफ धोरणामुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच भारतासह अनेक देशांवर ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ (Reciprocal Tariff) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जगात ‘ट्रेड वॉर’ सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांच्या या धोरणांकडे जगातील अनेक देश आपापल्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यातच ट्रम्प यांनी श्रीमंत होण्यासाठीची ही योग्य वेळ असल्याचे म्हणत, हे धोरण बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांबाबत कठोर भूमिका दर्शवली आहे. त्यांची धोरणे कधीही बदलणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर आणि चीनच्या प्रत्युत्तरामुळे जागतिक शेअर बाजारात प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या निर्णयाला योग्य ठरवत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी श्रीमंत होण्यासाठी योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) April 5, 2025
ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिले की, अमेरिकेत येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांसाठी माझी धोरणे कधीही बदलणार नाहीत. श्रीमंत होण्यासाठी ही उत्तम वेळ आहे, पूर्वीपेक्षाही अधिक श्रीमंत होण्याची वेळ आली आहे.
मोठे व्यवसाय शुल्काबद्दल चिंतित नाहीत, कारण त्यांना माहित आहे की हे शुल्क कायम राहतील. त्यांचे लक्ष मोठ्या, महत्त्वाच्या करारांवर आहे, जे आपल्या अर्थव्यवस्थेला गती देईल, असेही ते म्हणाले.
अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण
दरम्यान, ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकन शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. एस अँड पी 500 इंडेक्समध्ये (S&P 500 Index) 6% नी घसरण झाली. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनची ही दोन दिवसांतील सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 5 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले.
ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, चीनवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनला 20 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.





