डोनाल्ड ट्रम्प यांचा संयुक्त राष्ट्र महासभेत भारत – पाकिस्तान युद्धविराम घडवून आणल्याचा पुन्हा दावा

न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कथित युद्धविराम घडवून आणल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. मंगळवारी महासभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, “मी सात युद्धे संपवली. कोणत्याही पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा देशाने असा पराक्रम केलेला नाही किंवा त्याच्या जवळपासही पोहोचलेला नाही. मी हे अवघ्या सात महिन्यांत साध्य केले. यापूर्वी असा प्रयत्न कधीच झाला नव्हता आणि मला याचा अभिमान आहे.” यापूर्वीही ट्रम्प यांनी अनेकदा युद्धविरामाचे श्रेय घेतले आहे. मात्र, भारताने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम हा दोन्ही देशांमधील थेट चर्चेनंतर झाला असून यात कोणत्याही तृतीय पक्षाची भूमिका नव्हती.
रशिया-युक्रेन युद्धावरही भाष्य –
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “युक्रेन युद्धाचा उद्देश एक छोटीशी चकमक होता, पण तो दीर्घकाळ चालला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझे नेहमीच ‘चांगले’ संबंध राहिले आहेत, त्यामुळे हा प्रश्न सोडवणे सर्वात सोपे असावे, असे मला वाटले.” युद्धात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात, चांगल्या आणि वाईट दोन्ही, असेही ते म्हणाले.
.@POTUS: In a period of just 7 months, I have ended 7 un-endable wars… No president or prime minister—and for that matter, no other country—has ever done anything close to that, and I did it in just 7 MONTHS. pic.twitter.com/Zs3c9703gv
— Rapid Response 47 (@RapidResponse47) September 23, 2025
‘गाझामधील युद्ध तात्काळ थांबवावे’ –
ट्रम्प यांनी गाझातील युद्धविरामासाठी ‘प्रखर’ प्रयत्न करत असल्याचे सांगितले. “आम्हाला गाझातील युद्ध तात्काळ थांबवावे लागेल. शांतता चर्चा करावी लागेल. बंधकांना परत आणले पाहिजे. आम्हाला सर्व 20 बंधक परत हवे आहेत. तसेच 38 मृतदेहही परत मिळाले पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले. हमासने शांततेच्या योग्य प्रस्तावांना वारंवार नाकारले आहे, असा दावाही त्यांनी केला. पाश्चिमात्य देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देणे हे हमाससाठी ‘बक्षीस’ ठरेल, असे मत त्यांनी मांडले.
इराणवरील हल्ल्याचा उल्लेख –
ट्रम्प म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ अंतर्गत सात अमेरिकन बी2 बॉम्बर्सनी इराणच्या प्रमुख अणुस्थळावर 30,000 पौंड बॉम्ब टाकले, ज्यामुळे सर्वकाही उद्ध्वस्त झाले. जगातील कोणताही देश आम्ही जे केले ते करू शकला नसता.” त्यांच्या दाव्यानुसार, या हल्ल्याने इराणची अणुसंवर्धन क्षमता पूर्णपणे नष्ट झाली, परंतु अमेरिकेच्या संरक्षण मूल्यमापनानुसार, यामुळे इराण केवळ काही महिन्यांसाठी मागे पडला आहे.
संयुक्त राष्ट्रावर टीका –
ट्रम्प यांनी जागतिक संघर्षांमध्ये युद्धविराम घडवून आणण्यात आपली भूमिका असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्राऐवजी मला ही कामे करावी लागतात, हे दु:खद आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संयुक्त राष्ट्राने कोणतीही मदत केलेली नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, संयुक्त राष्ट्राकडून मला फक्त “खराब एस्केलेटर आणि खराब टेलिप्रॉम्प्टर” मिळाले. “संयुक्त राष्ट्र फक्त कठोर शब्दांचे पत्र लिहिते आणि त्यावर कधीच अंमल करत नाही,” असेही ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्राची क्षमता आणि अपयश –
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्राच्या अपयशावर बोट ठेवत म्हटले, “संयुक्त राष्ट्रात प्रचंड क्षमता आहे, पण ती त्याच्या पात्रतेनुसार कार्य करत नाही. मी लाखो लोकांचे प्राण वाचवण्यात आणि युद्धे थांबवण्यात व्यस्त होतो, तेव्हा मला याची जाणीव नव्हती. पण नंतर मला कळले की, संयुक्त राष्ट्र आमच्यासाठी नाही.”





