Donald Trump : युरोपच्या सुरक्षा हेतूंचे रक्षण करावे; युरोपातल्या नेत्यांचे ट्रम्प यांना आवाहन

ब्रुसेल्स : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेदरम्यान युरोपच्या सुरक्षा विषयक हितांचे रक्षण करावे, असे आवाहन युरोपातल्या नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केले आहे. युक्रेनच्या युद्धाच्या मुद्दयावरून ट्रम्प आणि पुतीन यांच्यात दिनांक १५ ऑगस्टला अलास्का येथे प्रत्यक्ष चर्चा होणार आहे. युरोपातल्या नेत्यांना आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनाही या चर्चेतून वगळण्यात आले आहे.
युक्रेनचे युद्ध समाप्त करण्याबाबत पुतीन गंभीर आहेत का नाहीत, हेच आपल्याला बघायचे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पण हे युद्ध समाप्त करण्यासाठी युक्रेनला आपल्या काही भूभागावर पाणी सोडावे लागेल, असे ट्रम्प म्हणाल्याने युरोपातील नेते निराश झाले आहेत. युक्रेनला पाठिंबा देत या चर्चेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न युरोपातल्या नेत्यांकडून केला जाऊ लागला आहे.
ट्रम्प आणि पुतीन यांच्यातल्या थेट चर्चेचे युरोपातल्या नेत्यांनी स्वागत केले असले, तरी युक्रेनच्या सहभागाशिवाय तेथील शांतता कराराबाबत निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असेही युरोपातल्या नेत्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे. दरम्यान युक्रेन आणि रशियाने एकमेकांवरील क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू ठेवले आहेत. युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाने केलेल्या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे. आणि ११ जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या दोनेत्स्क भागावर रशिया आता पुर्ण ताबा मिळवण्याच्या बेतात आहे. पोक्रोवस्क भागाच्या उत्तरेकडील भागात रशियाच्या सैन्याने जोरदार आगेकूच सुरू केली आहे.





