Donald Trump on Hamas। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली की इस्रायल आणि हमास गाझासाठी माघारीच्या रेषेवर सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी यावेळी “ही योजना हमाससोबत शेअर करण्यात आली असून हमासने त्याची पुष्टी करताच, युद्धबंदी ताबडतोब लागू होईल ” असे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी हे एक ऐतिहासिक क्षण म्हणून वर्णन करत,”हे ३,००० वर्ष जुने आपत्ती संपवण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत, “इस्रायलने प्राथमिक माघारीच्या रेषेवर सहमती दर्शविली आहे आणि हा प्रस्ताव हमासला पाठवण्यात आला आहे.त्यासोबतच हमासने यावर सहमती दर्शवताच, युद्धबंदी लागू होईल” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये,”ओलिसांची देवाणघेवाण सुरू होईल आणि इस्रायलच्या माघारीचा पुढील टप्पा निश्चित केला जाईल” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, “हा जगासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे आणि सर्वांनी त्यात सहभागी राहावे.” ट्रम्प यांचा हमासला इशारा Donald Trump on Hamas। ट्रम्प यांनी स्पष्टपणे हमासला आणखी उशीर करू नये असा इशारा दिला. त्यांनी म्हटले की,”जर हमासने लढाई सुरू ठेवली आणि शस्त्रे टाकली नाहीत तर सर्व अटी रद्द होतील.” राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी,”हा करार नाजूक आहे, परंतु दोन्ही पक्षांना सहभागी करून तो यशस्वी होईल. तसेच त्यांचे प्रशासन दोन्ही बाजूंना वाटाघाटींमधून मागे हटू देणार नाही” असेही म्हटले आहे. हमासचा सकारात्मक प्रतिसाद आणि ओलिसांची सुटका समोर आलेल्या वृत्तानुसार, “हमासने ट्रम्पच्या शांतता योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संघटनेने प्रस्तावातील प्रमुख मुद्द्यांवर सहमती दर्शविली आहे, ज्यात ओलिसांची सुटका, कैद्यांची देवाणघेवाण आणि गाझा प्रशासन पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे सोपवणे यांचा समावेश आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की येत्या काही दिवसांत सर्व ओलिसांची सुटका जाहीर केली जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे. इजिप्तमध्ये अप्रत्यक्ष चर्चेची तयारी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, इस्रायल आणि हमासचे प्रतिनिधी सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) इजिप्तमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू करतील. तथापि, काही मुद्दे अस्पष्ट आहेत. हमास सर्व अटी पूर्णपणे स्वीकारेल की नाही आणि इस्रायलच्या सुरक्षा चिंता कशा सोडवल्या जातील हे अनिश्चित आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी सांगितले की इस्रायल गाझामधून पूर्णपणे माघार घेणार नाही परंतु सुरक्षा नियंत्रणासाठी काही क्षेत्रे राखून ठेवेल. ट्रम्पची २०-कलमी गाझा योजना काय आहे? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २० कलमी गाझा शांतता योजनेत तात्काळ युद्धबंदी, ओलिस आणि कैद्यांची संपूर्ण देवाणघेवाण, गाझामधून टप्प्याटप्प्याने इस्रायली माघार, हमासचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखरेखीखाली असलेल्या संक्रमणकालीन सरकारची स्थापना यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत, हमास ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यात पकडलेल्या सर्व ओलिसांना, मृत आणि जिवंत, सोडण्याची अपेक्षा आहे. वृत्तांनुसार, हमासकडे सध्या ४८ ओलिस आहेत, ज्यापैकी अंदाजे २० जिवंत असल्याचे मानले जाते. मध्य पूर्वेतील शांततेची नवी आशा ! Donald Trump on Hamas। गाझामधील दीर्घकाळ चाललेल्या हिंसाचार आणि विनाशाच्या पार्श्वभूमीवर हा करार एक प्रमुख राजकीय आणि मानवतावादी वळण मानला जातो. संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय देशांनी ट्रम्प यांच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे आणि आशा व्यक्त केली आहे की यामुळे मध्य पूर्वेमध्ये कायमस्वरूपी शांततेचा पाया रचला जाईल. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की जर ही योजना यशस्वी झाली तर ती गेल्या दोन दशकांमधील सर्वात मोठी मध्य पूर्व शांतता कामगिरी ठरू शकते.