वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि चीन सारखे काही देश अणू चाचण्या करत आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अलिकडेच ट्रम्प प्रशासनाने अमेरिका पुन्हा अणू चाचण्या सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. तब्बल तीन दशकांच्या कालखंडानंतर अमेरिका पुन्हा अणू चाचण्या करायला सुरुवात करणार आहे. आपल्या या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीच इतर देश देखील अणू चाचण्या करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन व्यापार विषयक तणाव कमी करण्याच्या उद्देशाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आपल्या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच अमेरिका पुन्हा अणू चाचण्या सुरू करणार असल्याचे ट्रम्प यांनी या भेटीपूर्वीच म्हटले होते. रविवारी एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान अणू चाचण्या करत असल्याचे सांगितले. हे देश अणू चाचण्या करत आहेत. मात्र त्या बद्दल बोलत नाहीत. मा६ आम्ही खुल्या वातावरणात राहतो. आम्ही वेगळे आहोत. आम्ही या चाचण्यांबद्दल बोलतो. आम्ही चाचण्या करणार आहोत. कारण ते आणि इतरही चाचण्या ककरत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. रशियाने पोसेदोन अण्व्स्त्रसज्ज सुपर टोर्पेडोची चाचणी घेतल्याचे गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही म्हटले होते. इतर देश कोठे चाचण्या करत असतात, हे आपल्याला समजत नाही. कारण ते याबद्दल कधीच बोलत नाही. या चाचण्या भूमिगत होत असतात. त्यामुळेच त्याबद्दल कोणालाच समजत नाही. अशा अण्वस्त्रांची विश्वसनीयता तपासली जायला हवी. म्हणूनच अशा चाचण्या घेण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्यच आहे, असे ट्रम्प म्हणाले. जेव्हा इतर देश चाचण्या करतात आणि आम्ही चाचण्या करत नाही. तेंव्हा आपले सामर्थ्य वाढवल्याचे लक्षात यावे, म्हणून आम्हालाही चाचण्या घ्याव्याच लागतात, असे ट्रम्प यांनी जोर देऊन सांगितले. अमेरिकन सैन्य नियमितपणे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांची चाचणी करत असते. मात्र १९९२ पासून अमेरिकेने अशा क्षेपणास्त्रांचे स्फोट घडवून आणलेले नाहीत.