न्यूयॉर्क : न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठीची प्राथमिक फेरी डेमोक्रॅटिक पक्षाचे भारतीय वंशाचे नेते जोहरान ममदानी यांनी जिंकली आहे. आता ते डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात असतील. न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहराचे महापौरपद डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेल्या ट्रम्प यांचा राग अनावर झाला आहे. निवडणुकीपुर्वीच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ममदानी यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट विभागाने बेकायदेशीर परदेशी रहिवाशांविरोधात सुरू केलेली कारवाई ममदानी यांनी थांबवल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी उघड धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. त्यावर आपण ट्रम्प यांच्या धमकीला घाबरत नसल्याचे ममदानी यांनी म्हटले आहे. ममदानी हे कम्युनिस्ट विचारसरणीचे आणि वेडे असल्याची टीकाही ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी तर पुढे जाऊन ममदानी यांच्या नागरिकत्वाविषयी देखील शंका उपस्थित केली आहे. ममदानी १९९८ साली वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाले होते. ट्रम्प यांच्या धमकीनंतर ममदानी यांनी आपण अध्यक्षांची ही धमकी स्वीकारत असल्याचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.