डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडा आणि ग्रीनलँड देखील ताब्यात घेण्याचा मानस

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक करत वादग्रस्त दावे करायला सुरुवात केली आहे. पनामा कालव्यावर दावा सांगितल्यानंतर आता ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलॅन्डलाही ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्यांच्या या दाव्यावर अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आणि पनामा देशातल्या नेतृत्वाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
ट्रम्प यांचे पुत्र एरिक यांनी सोशल मीडियावर एक चित्र शेअर केले आहे. त्यामध्ये ट्रम्प कॅनडा, ग्रीनलॅन्ड आणि पनामा कालवा खरेदी करत असल्याचे दर्शवले आहे. आम्ही खूप मागे आहोत, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनीही अलिकडेच ग्रीनलॅन्ड ताब्यात घेण्याला आपले स्वारस्य उघड केले होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक स्वातंत्र्यासाठी या भूभागावरील अमेरिकेची मालकी आणि नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले होते.
सोमवारी ट्रम्प यांनी पनामा कालव्यावरीही दावा सांगणारी पोस्ट केली होती. पनामा कालव्यावर अमेरिकेचा ध्वज फडकत असल्याचे चित्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पनामा कालवा चुकीच्या हातामध्ये पडू देणार नाही. पनामा कालव्याचे अमेरिकेमध्ये स्वागत आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
पनामा कालव्याचे अमेरिकेच्या अर्थकारणासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे महत्व आहे. तत्वतः कायदेशीर आणि नैतिकतेच्याही दृष्टीने जर देण्याच्या उदार भावनेचे पालन केले गेले नाही, तर पनामा कालवा आम्हाला परत मिळावा, अशी मागणी आम्ही करू, अशी गर्भित धमकीच ट्रम्प यांनी दिली होती.
ट्रम्प यांच्या या धमकीवर पनामाचे अध्यक्ष जोस रॉल म्युलिनो यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. पनामा कालव्याचा प्रत्येक चौरस मीटर आणि आजूबाजूचा परिसर पनामाच्या मालकीचा आहे. तो यापुढेही पनामाच्याच मालकीचा असेल, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी तर कॅनडा हा देश अमेरिकेचा ५१ वे राज्य बनावे, अशी इच्छाही व्यक्त केली होती. कॅनडा अमेरिकेतील ५१ वे राज्य बनावे, अशी कॅनडातील अनेकांची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
ग्रीनलॅन्डवरील दावा डेन्मार्कने फेटाळला…
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टवर डेन्मार्कमधील विरोधी कन्झर्व्हेटीव्ह पक्षाचे संसद सदस्य रासमुस जारलोव्ह यांनी हुकुमशहांनी अन्य देशांची भूमी ताब्यात घेण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.
हा एक विनोद आहे का नाही, हे माहीती नाही. मात्र हे हसण्यावारी नेण्यासारखे निश्चितच असू शकत नाही. एका आठवड्यात कॅनडाला धमकी दिली जाते. आता डेन्मार्कला धमकी मिळते आहे. ग्रीनलॅन्ड १३८० पासून डेन्मार्कची भूमी आहे. यापुढेही ग्रीनलॅन्ड डेन्मार्कचाच असेल, हे निर्विवाद आहे. ही दगडावरची रेघ आहे. याबाबत कोणत्याही वाटाघाटी होऊ शकत नाहीत. लोकशाही देश अशी तडजोड करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.





