न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिका–भारत व्यापार चर्चांचा सूर चढलेला असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा टॅरिफ वाढीचा इशारा दिला आहे. रशियन तेलावर सहकार्याच्या मुद्द्यावरून दिलेल्या या इशाऱ्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार संबंधांबाबत पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. रशियन तेलाच्या खरेदीच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेला अपेक्षित सहकार्य केले नाही, तर भारतीय उत्पादनांवर लादण्यात येणारा आयात कर (टॅरिफ) वाढवण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी सोमवारी दिला आहे. फ्लोरिडाहून वॉशिंग्टन डीसीला जाताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टिप्पणी केली. याबाबतचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. ट्रम्प म्हणाले, भारताने रशियन तेलाच्या मुद्द्यावर आम्हाला मदत केली नाही, तर आम्ही भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवू शकतो. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षीच भारताने मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केल्याचे कारण देत भारतीय वस्तूंवरील टॅरिफ वाढवून 50 टक्के केला होता. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा इशारा दिला आहे. सन 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सध्याच्या 191 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या कराराला अंतिम रूप देण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. भारतीय निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेत अधिक संधी मिळण्याची अपेक्षा असतानाच ट्रम्प यांच्या या नव्या धमकीमुळे व्यापारी वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मोदींना माहिती होते, मी खुश नाही… यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करताना मोठे विधान केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी हे एक अतिशय चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहित होते, की रशियन तेलाच्या मुद्द्यावर मी खुश नव्हतो आणि मला खुश करणे गरजेचे होते. ते आमच्यासोबत व्यापार करतात आणि आम्ही त्यांच्या वस्तूंवर खूप लवकर टॅरिफ वाढवू शकतो. हे त्यांच्यासाठी खूप वाईट असेल, असा थेट इशाराही दिला.