अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर

मिलवायूकी (अमेरिका) : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून काल माजी अध्यक्ष आणि प्रमुख इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर दोनच दिवसात झालेल्या या अधिवेशनात ट्रम्प यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. ट्रम्प यांनी लगेचच ओहिओचे सिनेट सदस्य जेडी वान्स यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले आहे.
वान्स हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असून ते देशाला एकत्र बांधून ठेवतील, असा विश्वास ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी सांगितले. उपाध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नॉर्थ डकोटा प्रांताचे गव्हर्नर डॉग बर्गम यांच्याकडे बघितले जात होते. त्यांनी देखील वान्स यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. वान्स हे छोट्या गावातून आले असल्याने सामान्य जनतेशी त्यांचा जवळचा संपर्क आहे. अमेरिका प्रथम या अजेंड्याला ते योग्य प्रकारे उचलून धरू शकतील, असे बर्गम म्हणाले.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतरही अधिवेशनाचे नियोजन बदलले जाणार नाही, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मायकेल वॉटले म्हणाले होते. कानाला झालेल्या दुखापतीमुळे कानाला पट्टी बांधून ट्रम्प अधिवेशनात सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात सोमवारी झालेल्या मतदानानंतर ट्रम्प हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प हे २०१६ मधील निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र २०२० च्या निवडणुकीत त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांचा सामना पुन्हा एकदा बायडेन यांच्याशी होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा…
अधिवेशनकाळात सर्व सदस्य फाईट-फाईट-फाईट अशा घोषणा देत होते. शनिवारी गोळीबारानंतर ट्रम्प स्वतः देखील हाताची मूठ उंचावून याच घोषणा देत होते. पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा झाल्यावर उपस्थित सदस्यांनी एकच जल्लोष केला. मतदान सुरू असतानाच सर्व सदस्य मेक अमेरिका ग्रेट अगेन हे फलक फडकावत होते. अधिवेशनामध्ये फ्लोरिडा प्रांतातून मिळालेली मते निर्णायक महत्वाची ठरली, असे ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प यांनी सांगितले. एका पाठोपाठ एक प्रांतांमधील सदस्यांनी ट्रम्प यांनाच पुन्हा एकदा अध्यक्षीय उमेदवार बनवण्याचा कौल दिला.





