तेल अवीव : गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेल्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीची तयारी सुरू करणार असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. ट्रम्प यांचा प्रस्ताव हमासने स्वीकारला असून या संदर्भातील अन्य तपशीलांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. इस्रायलच्या नेत्यांच्या सूचनेनुसार युद्धबंदीच्या प्रस्तावावरील अंमलबजावणीची तयारी सुरू केली गेली आहे. आता इस्रायलचे गाझामधील सैन्य बचावासाठीच्या चौक्यांकडे सरकले आहे. आता इस्रायलचे सैन्य आक्रमण करणार नाही. मात्र गाझा पट्ट्यातील कोणतेही सैन्य मागे घेतले गेलेले नाही. पण आता ओलीस आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेचे वेळापत्रक इजिप्तच्या मध्यस्थांद्वारे निश्चित केले जाते आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हमासने ट्रम्प यांच्या प्रस्तावातील काही मुद्दे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलला गाझामध्ये बॉम्बफेक न करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी हमासच्या निर्णयाचे स्वागत केले असून हमास स्थायी शांततेसाठी उत्सुक असल्याचे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले. हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला रविवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. त्यापुर्वी हे युद्ध समाप्त करण्यासाठी आणि उर्वरित ओलिसांची सुटका करण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीने तयार केलेल्या प्रस्तावाला अनेक देशांनी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनीही मंजूरी दिली आहे. / प्रस्तावानुसार युद्ध समाप्त करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे नेतान्याहू यांनीही म्हटले आहे. त्यादृष्टीने या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला सुरुवात करणार असल्याचे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने शुक्रवारी रात्री उशीरा दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. मृतांची संख्या ६७ हजारांच्या पुढे हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या गाझा युद्धातील मृतांची संख्या ६७ हजारांच्यापुढे गेली आहे. गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मृतांच्या आकडेवारीमध्ये ७०० नवीन नावांची भर पडली आहे. पडताळणी केल्यानंतर ही नवीन नावे, मृतांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, असेही गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.