Donald Trump : डेन्मार्कला ग्रीनलँड परत देणे हा अमेरिकेचा मूर्खपणा होता; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

दावोस (स्वीत्झर्लंड) : दावोसमधील जागतिक आर्थिक मंचावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडबाबतच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. डेन्मार्कला कृतघ्न संबोधून दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीनलँड डेन्मार्कला परत देणे हा अमेरिकेचा मूर्खपणा होता, असे ट्रम्प म्हणाले. आम्ही डेन्मार्कसाठीच ग्रीनलँडमधअये तळ उभा केला. आम्ही डेन्मार्कसाठी लढलो. आम्हीच ग्रीनलँड वाचवले. शत्रूना ग्रीनलँडमध्ये पाय रोवण्यापासून आम्हीच रोखले.
महायुद्धानंतर ग्रीनलँड डेन्मार्कला परत दिले. असे करणारे आम्ही खरोखरच मूर्ख होतो. आता ते आमच्याशी किती कृतघ्न असल्यासारखे वागत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. आपल्या भूमिकेचा विस्तार करण्यासाठी ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या युद्धकालिन इतिहासाची उजळणी केली. डेन्मार्कचा जर्मनीकडून पाडाव झाला होता. स्वतःचे रक्षण करण्यास डेन्मार्क आणि ग्रीनलँड दोन्हीही असमर्थ होते. अमेरिकेला त्यांचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पुन्हा तेथे नाईलाजाने पाठवावे लागले होते. मोठ्या मुश्किलीने आणि मोठ्या खर्चाने ग्रीनलँड आणि डेन्मार्कला आम्ही वाचवले आहे. डेन्मार्कला हे माहिती आहे, असे ट्रम्प म्हणाले.
मात्र असे असले तरी आपल्याला डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नागरिकांविषयी नितांत आदर आहे, अशेही त्यांनी आवर्जुन सांगितले. नाटोचा सदस्य असलेल्या प्रत्येक देशाने स्वतःचे रक्षण करायला हवे. आमच्याशिवाय अन्य कोणताही देश ग्रीनलँडचे रक्षण करू शकणार नाही. चीन आणि रशियाकडून अमेरिका आणि नाटोच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रीनलँड महत्वाचा आहे. आर्क्टिक समुद्रातील बर्फ वितळते आहे. त्यामुळे मोठ्या देशांसाठी हा मार्ग खुला होतो आहे. त्यामुळे अमेरिकेकडेच ग्रीनलँड असणे आवश्यक आहे, असे ट्रम्प यांनी जोर देऊन सांगितले.
दावोसमधील जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीमध्ये ग्रीनलँडचा विषय सतत चर्चेत राहिला असतानाच ट्रम्प यांनी आपली भूमिका अधोरेखित केली आहे. दावोसमध्येच ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अनेक देशांबरोबर बैठका घेणार असल्याचे ट्रम्प यांनी यापुर्वीच म्हटले आहे. डेन्मार्क आणि अमेरिका दोन्ही देश नाटोचे सदस्य असल्यामुळे अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी उच्चस्तरिय मुत्सदेगिरीच्या माध्यमातून हा तणाव कमी करण्याचे प्रयत्न केले जातील, असे नाटोचे सरचिटणीस मार्क रुट म्हणाले होते. युरोपातील नॉर्वेआणि फ्रान्सने ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तेथे आपले लष्करी योगदान देण्याचे मान्य केले आहे. नाटोने ग्रीनलँडमध्ये आपले सराव सुरू ठेवावेत, असे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनी सुचवले आहे.





