Donald Trump : ट्रम्प यांच्याविरोधातील निवडणूक हस्तक्षेपाचा खटला रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेत २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करून निकाल उलथवून लावण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातला खटला फेडरल न्यायालयाने रद्द केला आहे. विशेष वकिल जॅक स्मिथ यांनी ट्रम्प यांच्याविरोधातला हा खटला रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार हा खटला रद्द करण्यात आला.
कॅपिटल हिलमध्ये समर्थकांना घुसवून अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालामध्ये अडथळा आणण्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवला गेला होता. महत्वाची कागदपत्रे बेकायदेशीरपणे हाताळणे आणि मार-ए-लागो येथील निवासस्थानी नेऊन ठेवण्याच्या आरोपांशी संबंधित खटला रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्याला विशेष वकिलांनी आव्हान दिले होते. ते आव्हान देखील मागे घेत असल्याचे जॅक स्मिथ यांनी न्यायालयाला संगितले.
त्यानुसार ट्रम्प यांच्या विरोधातला हा खटला रद्द करण्यात आला आहे. अमेरिकेतील २०२० च्या निवडणुकीतील हस्तक्षेप आणि कागदपत्रांची हाताळणी या दोन्ही प्रकरणांमध्ये ट्रम्प यांनी आपण दोषी नसल्याचे म्हटले होते. आता दोन्ही प्रकरणांच्या कायदेशीर प्रक्रियेवर पडदा पडला असल्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधातील कायदेशीर लढाईला पुर्णविराम मिळाला आहे.





