Donald Trump: इराणची ट्रम्प यांना भीती! ट्रम्प यांचा गुप्त विमानप्रवास; एअर फोर्स वनचा केला ‘दिखावा’
Donald Trump: इराणकडून हत्येची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कीयेतील नाटो शिखर परिषदेनंतर ब्रिटनला परतताना गुप्तपणे लष्करी विमान बदलल्याचा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.

Donald Trump: इराणकडून हत्येची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कीयेतील नाटो शिखर परिषदेनंतर ब्रिटनला परतताना गुप्तपणे लष्करी विमान बदलल्याचा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.
ट्रम्प एअर फोर्स वनमधून प्रवास करत असल्याचे भासवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात त्यांनी दुसऱ्या लष्करी विमानातून प्रवास केल्याचे वृत्त आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, ट्रम्प अंकाराहून ब्रिटनमधील रॉयल एअर फोर्स मिल्डेनहॉलकडे जुन्या एअर फोर्स वनमधून जात असल्याचे दाखवण्यात आले.
मात्र, विमानात चढल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांना विमानतळावरील कॅटरिंग ट्रकच्या मदतीने गुप्तपणे सी-३२ ए या छोट्या लष्करी विमानात हलवण्यात आले. त्यानंतर ट्रम्प यांनी याच विमानातून ब्रिटनपर्यंतचा प्रवास केला.
सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय? Donald Trump:
ट्रम्प तुर्कीयेतील नाटो शिखर परिषदेत असतानाच अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, कतारकडून भेट म्हणून देण्यात आलेल्या प्रस्तावित नव्या एअर फोर्स वनच्या सुरक्षेबाबतही काही प्रश्न उपस्थित झाले होते.
व्हाइट हाऊसचे संचार संचालक स्टीव्हन च्युंग यांनी ट्रम्प हे अनेक शत्रूंच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक साधनाचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरीकडे, डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर रिचर्ड ब्लुमेन्थल यांनी या घटनेची काँग्रेसमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या हालचाली, तसेच एअर फोर्स वनच्या वापराबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.






