Donald Trump : इराणबरोबरच्या युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प जी-7 परिषदेसाठी रवाना
इराणबरोबरच्या युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) जी-७ परिषदेसाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. शांतता कराराच्या घोषणेमुळे आता इराणविरोधात अमरिकेचे युद्ध समाप्त होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Donald Trump : इराणबरोबरच्या युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) जी-७ परिषदेसाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. शांतता कराराच्या घोषणेमुळे आता इराणविरोधात अमरिकेचे युद्ध समाप्त होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि इराणच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शांतता करार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात होते.
कालच ट्रम्प (Donald Trump) यांनी कराराबाबत सहमती झाल्याचे म्हटले होते. पण रविवारी इस्रायलने लेबनॉनमधील हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण होणार, अशी चिन्हे दिसायला लागली होती. आता कराराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वारे ट्रम्प यांच्यासाठी अनुकूल वाहू लागले आहेत. याचे समाधान घेऊन ट्रम्प आज एवियन-लेस-बेन्स येथे जी-७ च्या नेत्यांशी चर्चा करायला दाखल होणार आहेत.
या जी-७ गटातील काही देशांनी इराण युद्धाच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. इराण संघर्षाबद्दल खुद्द अमेरिकेतील जनताही ट्रम्प यांच्यावर नाराज होती. याचा परिणाम नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भोगावा लागू शकतो, अशी भीती रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनीही बोलून दाखवली होती.
युद्धबंदीमुळे जी-7 मध्ये स्थित्यंतराची शक्यता
जी-७ परिषदेपूर्वी इराणबरोबर शांतता करार होणे ही ट्रम्प यांच्यादृष्टीने मोठी घटना आहे. युद्धाला सुरुवात करण्यापुर्वी आपले मत विचारात न घेतल्याने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, जर्मन चान्सेलर फेड्रीक मर्ज आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ट्रम्प यांच्यावर नाराज होते.
दुसरीकडे युद्धात मदत न केल्याने युरोपीय संघ, नाटोचे सदस्य देशांवर ट्रम्प नाराज होते. या सर्व नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून केला जाऊ शकतो. होर्मूझमधील पाणसुरुंग हटवण्याच्या कामी ते फ्रान्स, ब्रिटन आदी देशांची मदत मागू शकतील, असे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी म्हटले आहे.
इराणला अर्थसहाय्य देण्याबाबत प्रश्न
आपला शांतता करार २०१५ च्या बराक ओबामा यांच्या करारापेक्षा वेगळा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणला होणारे अर्थसहाय्य रोखण्यात ओबामा यांचा करार अपयशी झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या करारात अमेरिकेबरोबर ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि युरोपीय संघ देखील सदस्य होते. २०१८ मध्ये ट्रम्प या करारातून बाहेर पडले. मात्र आताचा करार इराणला अणू कार्यक्रमासाठी होणारे अर्थसहाय्य कसे रोखू शकेल, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही. या प्रश्नाला ट्रम्प यांना जी-७ परिषदेत सामोरे जावे लागू शकते.
ट्रम्प यांच्याकडून पुतीन-झेलेन्स्की यांच्याशी चर्चा
जी-७ परिषदेसाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही निमंत्रण पाठवले गेले आहे. परिषदेपूर्वी ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि झेलेन्स्की दोघांशीही फोनवरून चर्चा केली आहे. आता रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी समेट घडवण्याच्या प्रयत्नांवर ट्रम्प यांच्याकडून भर दिला जाण्याची शक्यता अधिक आहे.






