Donald Trump: ‘इराणवर विश्वास ठेवणारा मी शेवटचा माणूस…’ ; गुप्त विमान प्रवासाची ट्रम्प यांच्याकडून कबुली
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्तानहून ब्रिटनला परतताना गुप्तपणे विमान बदलल्याची पुष्टी केली आहे.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कस्तानहून ब्रिटनला परतताना गुप्तपणे विमान बदलल्याची पुष्टी केली आहे. सिक्रेट सर्व्हिस आणि लष्कराच्या सल्ल्यानुसार आपल्याला दुसऱ्या विमानातून प्रवास करावा लागल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
याविषयी बोलताना ट्रम्प यांनी, “ते जे सांगतात, ते मी करतो. मला असं वाटत कि काही धोका असलं म्हणून त्यांनी असा सल्ला दिला असेल. मी याबाबत जास्त काही विचारले नाही. कारण मला सतत खूप धमक्या येतात,” असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच पुढे बोलताना त्यांनी,” उच्चपदस्थ आणि प्रभावशाली राष्ट्राध्यक्षांना अशा धमक्यांचा सामना करावा लागतो”, असे सांगताना ट्रम्प यांनी स्वतःला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली राष्ट्राध्यक्ष असल्याचा दावाही केला.
एअर फोर्स वनमध्ये चढले, पण काही मिनिटांत विमान बदलले Donald Trump:
अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, अंकारामध्ये टीव्ही कॅमेऱ्यांसमोर ट्रम्प एअर फोर्स वनमध्ये चढले. मात्र, काही मिनिटांतच त्यांना विमानतळावरील कॅटरिंग ट्रकच्या मदतीने लहान लष्करी C-32A विमानात गुप्तपणे हलवण्यात आले.
नाटो शिखर परिषदेसाठी तुर्कस्तानला जाताना ट्रम्प यांनी कतारकडून भेट म्हणून मिळालेल्या नव्या बोईंग 747-8 विमानातून प्रवास केला होता. परतीच्या प्रवासासाठी मात्र जुन्या एअर फोर्स वनचा वापर करणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती.
मात्र, जुन्या एअर फोर्स वनमध्ये असलेल्या पत्रकारांनाही ट्रम्प त्यांच्यासोबत प्रवास करत नसल्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे उड्डाण दिशाभूल करण्यासाठी असल्याचे समोर आले. सिक्रेट सर्व्हिसने पत्रकारांना विमानाच्या खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
इराणच्या धमकीमुळे सुरक्षा वाढवली
वृत्तानुसार, इराणकडून असलेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण सुरक्षा प्लॅन आखण्यात आला होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘सीबीएस न्यूज’नेही यापूर्वी गुप्तचर यंत्रणांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा त्यांच्या विमानावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, मिल्डेनहॉल एअर बेसवर तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांना नवीन एअर फोर्स वन पाहता यावे, यासाठी ते विमान आधीच ब्रिटनला पाठवण्यात आल्याचे ट्रम्प यांनी त्यावेळी सांगितले होते.
मात्र, ट्रम्प यांच्या विमान बदलाच्या घटनेनंतर कतारकडून मिळालेल्या नव्या विमानाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर या विमानात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आणि सुधारणा करण्यात येतील, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
मिल्डेनहॉलनंतर पुन्हा एअर फोर्स वनमधून वॉशिंग्टनला रवाना Donald Trump:
ब्रिटनमधील मिल्डेनहॉल एअर बेसवर पोहोचल्यानंतर छायाचित्रकारांनी ट्रम्प यांना विमानातून उतरताना पाहिले. यावरून ते पत्रकारांच्या नजरेपासून दूर राहून मूळ एअर फोर्स वनमध्ये पुन्हा चढल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर त्यांनी नवीन एअर फोर्स वनमधून वॉशिंग्टनकडे प्रयाण केले.
विमानातील पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांना इराणकडून खरोखरच गंभीर धोका आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मला नेहमीच धमक्या येतात. त्यांच्या यादीत मी तुमच्यापेक्षा वर आहे. पण जर मी गेलो, तर तुम्हीही जाल,” असे म्हटले. इराणने वारंवार खोटे बोलल्याने त्यांचा इराणवर विश्वास नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.त्यासोबतच त्यांनी इराणवर विश्वास ठेवणारा कदाचित मी शेवटचा माणूस असेल असेही त्यांनी म्हटले.
इराण-अमेरिका संघर्षामुळे तणाव वाढला
ट्रम्प तुर्कस्तानमध्ये असताना अमेरिकी लष्कराने इराणवर अनेक हल्ले केले होते. या प्रदेशातील व्यापारी जहाजांवर इराणकडून झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले.
दुसरीकडे, इराणने आपल्या भूमिकेवरून माघार घेण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने प्रथम इराणी बंदरांवरील नाकेबंदी उठवली तरच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा विचार केला जाईल, अशी भूमिका इराणने घेतली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर हा महत्त्वाचा जलमार्ग बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. जगातील सुमारे २० टक्के तेलपुरवठा या मार्गातून होत असल्याने होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावरही झाला आहे.






