न्यूयॉर्क : अमेरिकेच्या नौदल सिल याच विशेष दलाने अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानातील आश्रयस्थानात घुसून त्याच्या डोक्यात गोळी झाडली होती, हे इतिहास कधीही विसरणार नाही अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस नेव्ही सिलचे कौतुक केले आहे. सप्टेंबर २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी हल्ला करण्याच्या एक वर्ष आधी आपण ओसामा बिन लादेनबद्दल इशारा दिला होता, असा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. ९-११ च्या हल्ल्याच्या एक वर्ष आधी अधिकाऱ्यांना बिन लादेनचा माग ठेवण्यास आपण सांगितले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नव्हती. लादेनने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवून दिले. मी त्याची पूर्वकल्पना दिली होती, याचे श्रेय मला घ्यावे लागेल. कारण अन्य कोणीही हा उल्लेख करणार नाही, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असेही ट्रम्प म्हणाले. मे २०११ मध्ये, यूएस नेव्ही सील्सने एक ऑपरेशन केले. त्यामध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथील एका घरात लपून बसलेल्या बिन लादेनला ठार मारण्यात आले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी परवानगी दिल्यानंतर हा छापा टाकण्यात आला होता. व्हाईट हाऊसमधील एका बंद कक्षामध्ये बसून ओबामा यांनी हे ऑपरेशन लाईव्ह बघितले होते आणि नंतर देशवासियांना उद्देशून या ऑपरेशनची माहिती देखील त्यांनी दिली होती. अफगाणिस्तानमधून अचानक माघार घेतल्याबद्दल ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर खूप टीका केली होती. अफगाणिस्तानमधील युद्ध अमेरिकेला सहज जिंकता आले असते, असेही ते म्हणाले.