Donald Trump : बायडेन यांच्या इमिग्रेशन धोरणामुळेच गुन्हेगारी वाढली; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

ह्युस्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या इमिग्रेशनविषयीच्या धोरणांवर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. डल्लासमध्ये एका मॉटेलचे व्यवस्थापक असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या व्यक्तीने निघृण हत्या केल्याच्या अनुषंगाने ते बोलत होते. ही हत्या करणाऱ्याला ट्रम्प यांनी बेकायदेशीर परदेशी असे संबोधले आहे. हत्या करणारा क्युबातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेत स्थायित झालेला होता. या मारेकऱ्याला परत पाठवून द्यायला हवे होते. मात्र माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या इमिग्रेशनशी संबंधित सौम्य धोरणामुळे ते होऊ शकले नाही. बेकायदेशीर स्थलांतरीत गुन्हेगारांबाबत सौम्यपणा दाखवणे आता समाप्त झाले आहे, असे ट्रम्प म्हणाले.
मूळचे भारतातील कर्नाटकमधील असलेल्या चंद्रा मौली उर्फ बॉब नागामलैय्याह या ५० वर्षीय मॉटेल व्यवस्थापकावर १० सप्टेंबर रोजी डाऊनटाऊन सूटस या मॉटेलमध्ये एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली होती. ही हत्या नागामलैय्या यांची पत्नी आणि १८ वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखतच झाली होती. या हत्येमुळे अमेरिकेतल्या भारतीय समुदायामध्ये तीव्र संतापाची लाट उमटली. हत्या करणारा योरदानिस कोबोस-मार्टिनेझ याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याला पूर्वी देखील ताब्यात घेण्यात आले होते, मात्र जानेवारी महिन्यात क्युबाने त्याला पुन्हा आपल्या देशात स्वीकारण्यास नकार दिला होता, असे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागामलैय्या यांच्या पार्थिवावर १३ सप्टेंबर रोजी टेक्सासमधील फ्लोवर माऊंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. नागामलैय्या यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ३२१,३२६ डॉलरचे निधीसंकलन करण्यात आले आहे. बेकायदेशीर शरणार्थ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावरील चर्चा या प्रकरणामुळे पुन्हा वाढली आहे. संबंधित देशांनी शरणार्त्यांना पुन्हा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अमेरिकेच्या प्रशासनापुढे आव्हान उभे राहिले आहे.
वॉशिंग्टनमध्ये आणिबाणी लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये आणिबाणी लावण्याचा इशारा दिला आहे. वॉशिंग्टनचे प्रशासन जर मेट्रोपोलिटन पोलीस डिपार्टमेंट आणि इमिग्रेशन ऍन्ड कस्टम्सला सहकार्य करणार नसल, तर वॉशिंग्टनमध्ये आणिबाणी लावली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टनमध्ये पुन्हा गुन्हेगारी होऊ देणार नाही. वॉशिंग्टनमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी आपले प्रशासन प्रयत्नशील आहे. सर्वात धोकादायक आणि हत्याकांडांनी हे शहर अमेरिकेत आणि सर्व जगामध्ये गाजते आहे. गुन्हेगारांवरील कारवाईमुळे काही आठवड्यातच हे शहर सर्वात सुरक्षित शहर झाले आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.





