Donald Trump : ब्रिक्सवर अतिरिक्त आयात शुल्क लावणार; ट्रम्प यांनी दिला इशारा

न्यूयॉर्क : ब्रिक्स गटाकडून अमेरिकेच्या डॉलरवर हल्ला केला जात असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ब्रिक्समध्ये सामील होऊ पाहणाऱ्या देशांवर आयात शुल्क लावण्याचा इशारा आपण दिल्यानेच प्रत्येक देश मागे हटला आहे, असा दावाही त्यांनी केला. ब्रिक्स गटामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.
अमेरिका विरोधी धोरणे राबवल्याबद्दल ट्रम्प यांनी ब्रिक्सवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची धमकी यापुर्वीही अनेकदा दिली आहे. मात्र ब्रिक्स गटावर अमेरिकेकडून एकतर्फी आयात ल्क लावले जाण्याबद्दल ब्रिक्स देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई यांच्याशी ट्रम्प यांची मंगळवारी द्विपक्षीय चर्चा झाली. डॉलरबाबत आपण कठोर आहोत.
ज्या देशांना डॉलरमधून व्यवहार करायचे आहेत, त्यांना डॉलरशिवाय व्यवहार करणाऱ्यांपेक्षा अधिक फायदा होईल. ज्यांना ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचे असेल, त्यांना होऊ द्या. पण या गटावर अमेरिका अतिरिक्त आयात शुल्क लावणार आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे, असे ट्रम्प म्हणाले. जर अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडेन किंवा कमला हॅरिस निवडल्या गेल्या असत्या, तर या देशांचे चलन डॉलर राहिला नसता, असेही ते म्हणाले.





