Dollar Vs Rupees: रुपयाचे मूल्य 33 पैशांनी वाढून 86 रुपये 65 पैसे प्रति डॉलर पातळीवर

मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत आहेत. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. अशा परिस्थितीतही गुरुवारी चलन बाजारात भारतीय रुपयाचे मूल्य 33 पैशांनी वाढून 86 रुपये 65 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेले.
या घडामोडीबद्दल चलन व्यापार्यांनी सांगितले की, पाच दिवसापासून रुपयाच्या मूल्यावर दबाव होता. मात्र सध्या भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांनी डॉलर विक्री वाढविली आहे. तसेच रिझर्व बँक काही प्रमाणात हस्तक्षेप करीत आहे. त्यामुळे रुपयाच्या मूल्यात वाढ होण्यास मदत झाली. त्याचबरोबर जागतिक पेचप्रसंग मिटण्याची शक्यता काही प्रमाणात निर्माण झाली आहे. रशिया- युक्रेन युद्ध मिटविण्यासाठी वाटाघाटी चालू आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर काही प्रमाणात कमकुवत झाला.
त्यामुळेही रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत झाली. 6 मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.21 टक्क्यांनी कमी होऊन 106.95 अंकावर गेला. काही दिवसापूर्वी हा निर्देशांक 110 अंकाच्या पुढे गेला होता. जर डॉलर कमकुवत होत गेला तर रुपयाचे मूल्य सुधारण्यास मदत होईल असे सांगितले जाते.
रिझर्व बँकेने अर्थव्यवस्थेवर जारी केलेल्या मासिक अहवालामध्ये आगामी काळामध्ये अनेक पातळ्यावर अर्थव्यवस्था आगेकूच करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वाहनांची विक्री वाढत आहे. विमानाने प्रवास करणार्यांची संख्या वाढत आहे. पोलादाची विक्री वाढत आहे. जीएसटी संकलन वाढत आहे. या कारणामुळे अर्थव्यवस्था सुधारण्याची शक्यता आहे. या घडामोडीचा रुपयाच्या मूल्यावर सकारात्मक परिणाम झाला.





