डॉलरचे मूल्य 4 वर्षाच्या निचांकावर

मुंबई : अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध आणि जागतिक व्यापारात होत असलेली घट या कारणामुळे अमेरिकेचा डॉलर 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात तब्बल दहा टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. 1970 नंतर प्रथमच डॉलरच्या मूल्यात इतक्या वेगाने घट झाली आहे. सध्या डॉलरचा दर चार वर्षाच्या निचांंकावर आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले असतानाच ट्रम्प यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये खर्च वाढविण्याबरोबरच विविध करांमध्ये कपात जाहीर केली आहे. त्यामुळे अमेरिकेवरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डॉलरचे दर कमी होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात डॉलर दहा टक्क्यांनी कमकुवत झाला असतानाच याच कालावधीमध्ये युरोपियन युरो 13.8% वधारला आहे.
ब्रिटन आणि जपानचे चलनही या कालावधीत वधारले आहे. दरम्यान या घडामोडीचा फायदा रुपयाला होत असून रुपयाचा भाव वाढत राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी रुपयाचा भाव 25 पैसे वाढून 85.51 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. खनिज तेलाच्या किमती कमी होणार असल्यामुळे रुपयाच्या मूल्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





