मुख्यमंत्री फडणवीस दलितांचा तिरस्कार करतात का? – दीपक केदार यांचा सवाल

परभणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील दलित व बहुजनांचा तिरस्कार करतात का? असा सवाल पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. दीपक केदार यांनी गुरुवारी परभणी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी वरील सवाल केला.
देवेंद्र फडणवीस यांना दलित बहुजनांचा तिरस्कार आहे का? कारण मागील 10 वर्षांत त्यांनी एकदाही दलित अत्याचार झालेल्या ठिकाणी भेट दिली नाही. ते राज्याचे गृहमंत्री होतात तेव्हाच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून दलितांवर हल्ले का होतात? असे ते म्हणाले.
परभणी प्रकरण हे रमाबाई आंबेडकरनगर येथील गोळीबारासारखे आहे. मनोहर कदमच्या भूमिकेत अशोक घोरबांड होता. हे जवळपास 10 जणांच्या हत्याकांडाचे षडयंत्र असावे. मनोहर कदमला शिक्षा झाली असती तर हा घोरबांड निर्माण झाला नसता.
या घोरबांडला कर्मठ हिंदुत्त्ववादी संघटनांनी प्रशिक्षण दिल्याचा आम्हाला संशय आहे. त्याची जातीयवादी वृत्ती ही एखाद्या संघटनेशी जोडल्यासारखी असल्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.





