नियतीचा क्रूर खेळ ! डॉक्टर दाम्पत्यासह ३ मुलांचा विमान अपघातात मृत्यू; सेल्फी ठरला शेवटचा क्षण…

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 चा टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. ७०० फूट उंची गाठलेले हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले, ज्यामुळे २४२ प्रवाशांपैकी केवळ एकजण वाचला. या दुर्घटनेतील करुण कहाण्या आता समोर येत आहेत, ज्याने सर्वांचे मन सुन्न झाले आहे.
या अपघाताने बांसवाडा येथील व्यास कुटुंबातील पाच जणांचा अंत झाला. डॉ. प्रतीक जोशी आणि डॉ. कोमी व्यास यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचा प्रद्युत, मिराया आणि नकुल यांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.
लंडनला नवजीवन सुरू करण्याच्या स्वप्नांसह विमानात बसताना काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा क्षण ठरला. हा हृदयद्रावक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. कोमी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या, तर डॉ. प्रतीक जोशी लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होते. गेल्या महिन्यात डॉ. कोमी यांनी नोकरी सोडून कुटुंबासह लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या प्रवासाच्या उत्साहात त्यांनी विमानात कुटुंबासह सेल्फी काढला, पण नियतीने त्यांचे स्वप्न भंग केले. या अपघाताने संपूर्ण कुटुंब कायमचे हिरावले गेले.
अभिनेत्री पायल घोषच्याही जवळच्या व्यक्तीचे निधन
या अपघातात बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषच्याही जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असून, तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. RIP प्रिती, माझ्या भावना चॅटर्जी कुटुंबासोबत आहेत.#AhmedabadPlaneCrash असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
प्रिती चॅटर्जी ही पायल घोषची जवळची मैत्रिणी होती. तिच्या अचानक निधनामुळे अभिनेत्री पायल घोषला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी सावरण्यासाठी बळ मिळो, असे देखील पायलने पोस्टमध्ये म्हटले आहे.





