शिरूरमध्ये डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला; गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात शितोळे क्लिनिकमध्ये एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला करण्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र शिरसाठ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बाबुराव नगर येथील शितोळे क्लिनिकमध्ये ही घटना घडली. फिर्यादी डॉ. आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रवींद्र शिरसाठ (रा. बाबुराव नगर, शिरूर) याने क्लिनिकमध्ये येऊन “तू आमच्या मेडिकलमध्ये पेशंटला गोळ्या-औषधे घेण्यासाठी का पाठवत नाहीस?” असे म्हणत डॉ. शितोळे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावेळी आरोपीने हाताने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे, तर कमरेचा बेल्ट काढून डॉक्टरांच्या हातावर आणि पाठीवर मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली.
या घटनेनंतर डॉ. शितोळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगत करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय व्यावसायिकांवरील हल्ल्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.





